*अक्षर मानवच्या माध्यमातुन पुरग्रस्तांना मदत.*
गेला आठवडाभर अक्षर मानव संघटनेनं पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचं काम केलं. विविध ठिकाणी मदतीचं आवाहन करणं, आवश्यक साहित्याची यादी करणं, घरोघरी जाऊन मदत गोळा करणं, मिळालेल्या मदतीतुन वापरण्यायोग्य स्वच्छ सामान निवडणं, पुरेसं सामान प्रत्येक कुटुुंबात पोहचावं म्हणुन गरजेच्या वस्तुंच्या नीटनेटक्या किट्स, पॅकेज तयार करणं, योग्य ठिकाणी मदत पोहचवणं यासाठी आठवडाभर माणसं सातत्यानं राबली. पुरग्रस्त गावातल्या जबाबदार नागरीकांशी बैठकी, लोकांशी प्रत्यक्ष बोलुन त्यांना काय हवंय त्याचा रितसर अभ्यास, गरजु कुटुंबांची यादी करुन त्यांना मदत मिळवुन देणं. किमान चारपाच लाखांची मदत चारपाच दिवसात वस्तुस्वरुपात जमा झाली. माणसं माणसांसाठी एकञ आलीत तर माणसांच्या भल्याचं काम सहजपणे करु शकतात हाच अनुभव ह्या मदत संकलन उपक्रमात आला. अचानक आलेल्या पुरानं हैदोस घातला, लोकांची घरं अक्षरश: पाण्यात बुडाली, घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तु, सगळा संसारच पाण्यात वाहुन गेला. आठवणीनं थरकाप उडवणारा एेंशी वर्षातला सगळ्यात भयंकर महापुर. ज्यांनी अनुभवला त्यांच्या वेदना कमी करणं निव्वळ अशक्य. पुर ओसरलाय, जमिनी कोरड्या झाल्यात, पण काही घरांच्या भिंती कोसळल्या, कौलं पडलीत. असं काही घडेल याची कल्पनाही नसतांना तासभरात लोकांच्या डोक्यावरचं छत गेलं, काटकसरीनं कित्येक वर्ष जमा केलेला संसार पाहता पाहता वाहुन गेला. मुलांची वह्या-पुस्तकं, महत्त्वाची कागदपञं, शेतं, पीकपाणी सगळंच पाण्यात. तरीही लोकं खंबीरपणे सावरु पाहतायत. परिस्थितीचा सामना करतायत. ह्या आशावादाला सलाम. या परिस्थितीत त्यांना शक्य ती मदत करणं गरजेचं आहे म्हणुन तुर्तास खाण्यापिण्याचं सामान, कपडे, स्वच्छतेची साधनं, औषधगोळ्या किमान काही दिवस पुरेल अशी मदत अक्षर मानवच्या माध्यमातुन महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या #कारदगा गावातल्या पुरग्रस्तांपर्यंत पोहचवली. मदत गावात पोहचली की आशाळभुत नजरेनं लोकं मदतीसाठी धावतायत. गर्दी करतायत. सगळ्यांनाच मदत पुरवणं शक्य होत नाहीये पण किमान काही कुटुंबाना मदत करता आली तरी त्यांच्या दृष्टीनं ती खुप मोठी ठरतेय. अक्षर मानव यात मदत करु शकलं याचा आनंद आहे पण मनापासुन वाटतं की अशी मदत करण्याची वेळ पुन्हा न यावी. सरकारी मदत मिळावी म्हणुन लोकांनी अजुन पडलेल्या घरांचा मलबा काढलेला नाही. राहण्याची सोय नाही. घरबांधणीसाठी आर्थिक मदत, भांडीकुंडी, शैक्षणिक साहित्य हि मदतही जमा होणं गरजेचं आहे. पडलेली घरं वर्षभरात उभी राहतीलही पण पुर मनातुन ओसरेल की नाही सांगता येत नाही. सध्यातरी पुरग्रस्त भागात कोणी पर्यटनासाठी म्हणुन जाऊ नये. तिथली माणसं मदत करणाऱ्यांचीच आतुरतेनं वाट पाहतायत. जमा केलेली मदत योग्य ठिकाणी पोहचावी म्हणुन अक्षर मानव कोल्हापुर टिमनं विशेष मेहनत घेतली. पुरग्रस्त भागात सुरुवातीपासुन मदतीसाठी राबणाऱ्या या माणसांचं कौतुक अन् अभिमान वाटतो. 🙏🙏🙏
ज्योती ठोंबरे
अक्षर मानव

Comments
Post a Comment